Aadharstambh E Book 

Tribute To Nagnath Phatale - Editor Dr Sudha Kankaria

E Smarnika_Shri_Nagnath_Phatale
श्री नागनाथ फटाले यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त
 पत्रकारिता आणि अध्यात्मिक क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या अण्णांना मानवंदना म्हणजेच ही "आधारस्तंभ"  ई स्मरणिका 
Download Aadharstambh_EBook_Tribute_To_Nagnath_Phatale_Editor Dr Sudha Kankaria
श्री नागनाथ फटाले पत्रकारिता जीवन साधना गौरव पुरस्कार 
वितरण सोहळा

          ‘आधारस्तंभ’ ही ई-स्मरणिका आपल्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. माझे पिताश्री श्री नागनाथ नरसिंगराव फटाले यांनी 23 जून 2026 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण केले. लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे छत्र हरपले. जीवनात अनेक खाचखळगे आले, अनेकविध स्पीडब्रेकर त्यांना ओलांडावे लागले, पैशाअडक्याची वानवा होती पण मनाच्या शक्तीची श्रीमंती होती. आणि त्याच बळावर त्यांचे अवघे आयुष्य सर्वार्थाने यशस्वी ठरले. 

          माझ्या मातोश्री सौ. सिंधु नागनाथ फटाले यांनीही आपल्या वयाची 85 वर्षे पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण केले. तीर्थरूप अण्णा (श्री नागनाथ फटाले) व आई यांचा नवती व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा एकत्रितपणे साजरा करावा असे आम्ही कुटुंबियांनी ठरवले. व तयारीला सुरूवात केली. अण्णांचे कुटुंब काही छोटे नाही. वैयक्तिक फटाले कुटुंब, अण्णांना गुरूस्थानी मानणारे गुरूपरिवार व पत्रकार मित्रमंडळी यांचा एक वेगळा परिवार. आमच्या साईबन कृषी पर्यटन क्षेत्र येथे गुरूपौर्णिमेच्या दिवशी हा सोहळा साजरा करण्याचा ठरला. आणि अत्यंत उत्साहाने तो साजराही झाला. त्यावेळेस अनेकजणांनी आपल्या अनुभवरूपी भावना व्यक्त केल्या. या सर्व भावना शब्दरूप व्हाव्यात व त्याचे एक ई-बुक व्हावे असे मला वाटले व त्याप्रमाणे मी सर्वांना त्यांच्या भावना लिहून पाठवायची विनंती केली आणि म्हणता म्हणता 50 लेखांचा हा संच निर्माण झाला.

         ‘आधारस्तंभ’ या ई-स्मरणिकेच्या पहिल्या भागात सर्व पत्रकार बंधूनी लिहिलेले लेख आहेत. त्यामधून आदरणीय अण्णांचा सुमारे 60 वर्षांचा पत्रकारितेबद्दलचा कार्यपरिचय आपल्याला होतो. नागनाथ फटाले यांची लेखणी ही केवळ एका पत्रकाराची लेखणी नाही तर ती समाजजागृतीची मशाल आहे, ती मूल्यांची वाट दाखवणारा दीपस्तंभ आहे आणि पुढील पिढयांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे याची जाणीव यातून होते.

दुसर्‍या भागात गुरू परिवारातील काही सदस्यांनी आपले  अनुभव लिहिलेले आहेत. अण्णांची अध्यात्मिक उंची यातून प्रतिबिंबीत होते. अनेकांना आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत. अडिअडचणीच्या काळात जेंव्हा सर्व मार्ग बंद होतात, माणूस पूणपणे खचून जातो तेंव्हा अण्णांनी दाखविलेला मार्ग व त्यांचा आशीर्वाद नवसंजीवनीचे कार्य करतो याची प्रचिती हे लेख देतात. 

                तिसर्‍या भागात फटाले कुटुंबीय व इतर जवळचे नातेवाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी अण्णांची सर्वात मोठी लेक डॉ. सुधा, नंतर श्री सुनील, डॉ हेमंत व श्री प्रशांत, अण्णांचे जावई डॉ. प्रकाश, सर्व सुना, सर्व नातवंड, नातसुना, व्याही, मित्रमंडळी तसेच पणती सर्वात छोटी स्मिरा(नातू डॉ. वर्धमान याची मुलगी) सर्वांनीच आपल्या लेखणीने तीर्थरूप अण्णांना अभिवादन केले आहे. ‘आधारस्तंभ’ म्हणजे चार पिढयांनी तीन भाषांमध्ये व्यक्त केलेल्या भावना आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा यात समावेश आहे.

               आदरणीय अण्णांच्या जीवनतपश्चर्येला अभिवादन करण्यासाठी आमच्या मानकन्हैय्या ट्रस्टच्या वतीने ‘श्री नागनाथ फटाले पत्रकारिता जीवन साधना गौरव पुरस्कार’ देण्याचे आम्ही ठरवले. आणि प्रथम पुरस्कारासाठी श्री विजय कुवळेकर सरांचे नांव एकमतानं निश्चित झाले. मूल्यनिष्ठ पत्रकारिता, विधायक सामाजिक दृष्टिकोन आणि बहुआयामी साहित्यिक योगदान यांचा संगम असणारे श्री. विजय विश्वनाथ कुवळेकर हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे नाव आहे. पत्रकारिता, साहित्य, चित्रपट, दूरचित्रवाणी, नाट्य आणि प्रशासकीय क्षेत्र अशा विविध माध्यमांत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविली आहे. त्यांचा सविस्तर परिचय या स्मरणिकेत सन्मानपत्राच्या रूपाने वाचायला मिळेल. तसेच कुवळेकर सरांनी अण्णाविषयीच्या भावना त्यांच्या ‘व्रतस्थ’ या लेखातुन व्यक्त केल्या आहेत.

सदर पुरस्कार दर दोन वर्षाला पत्रकारिता क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीला दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार 22 सप्टेंबर 2026 रोजी छ.संभाजीनगर येथे संपन्न होत आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे साहेब यांच्या हस्ते व छ. संभाजीनगरचे महापौर श्री समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. आणि याच वेळेस या ‘आधारस्तंभ’ स्मरणिकेचेही प्रकाशन होईल. या स्मरणिकेच्या सुरूवातीसच महामहिम राज्यपाल मा. श्री हरिभाऊ बागडे यांचे शुभचिंतन पत्र तसेच महापौर छ.संभाजीनगर मा. श्री. समीर राजूरकर यांचे शुभेच्छापत्र सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मी त्यांचे आभार मानते. या सोबतच या अंकात आदरणीय अण्णां विषयीचे अनेक व्हिडीओ, फोटो, नवतीचा समारंभ, गुरूवंदना, माहितीपट, मुलाखती, ई. चे लिंक दिलेली आहे. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

मा. अण्णा म्हणजे पत्रकारिता, समाजशिक्षण व अध्यात्मिक क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्व आहे. व आई म्हणजे खर्‍या अर्थाने वात्सल्याची सिंधू व संस्काराची संस्कृती आहे. हे दोघेही आम्हासाठी ‘आधारस्तंभ’ आहेत. मी तीर्थरूप आई व अण्णांना वंदन करते. त्यांचा आशीर्वादाचा हात आमच्यासह सर्वांच्या मस्तकावर सदा राहो. या दोघांनाही येथून पुढच्या काळात आरोग्यदायी, अखंड आनंद व समाधानाने भरपूर जीवन प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. 


ज्ञान, प्रेम, न्याय, समर्पण, धैर्य शिकविणारा 

महायज्ञ म्हणजे आधारस्तंभ.

कर्तव्यभावना व सुसंस्काराचा सुगंध पसरविणारा 

कस्तुरीमृग म्हणजे आधारस्तंभ.

सर्वांना स्नेहाच्या ध्याग्यांनी बांधून ठेवणारा

विश्वप्रपंच म्हणजे आधारस्तंभ.

भटकलेल्या मनाला योग्य दिशा दाखविणारा 

दीपस्तंभ म्हणजे आधारस्तंभ!


                या स्मरणिकेसाठी मदत करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्री. चंद्रकांत पालवे, श्री. अनंत दसरे तसेच मुखपृष्ठासाठी कु. प्रिया सोनटक्के, श्री. प्रशांत फटाले, या स्मरणिकेतील सर्व लेखक व सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींची मी आभारी आहे.

धन्यवाद!

 
डॉ सुधा कांकरिया 
संपादक
आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित